Words of Wisdom for My Son

By Alex from Ithaca (Father and Son) [CC BY 2.0 (http://creativecommons.org/licenses/by/2.0)], via Wikimedia Commons

This is alt

पोरासाठी चार शब्द
– उत्तम कांबळे
(Sakal, Saptrang, Sunday, January 24, 2010 AT 12:40 PM (IST))

प्रिय पोरा,
सगळेच विद्यार्थी नसतात गुणवान,
नसतात सगळेच ज्ञाननिष्ठ
तुलाही हे सारं कळेलच कधी ना कधी…
मात्र, आता थोडं हेही शिकच ः
जगात प्रत्येक महापुरुषामध्येही
असतो एक सामान्य बुद्धीचा विद्यार्थी
प्रतिभावंत विद्यार्थी असतात जगात;
तसे सारे आयुष्य लढाई करून
स्वतःला जायचे तेथेच
जाणारेही असतात विद्यार्थी.
मला माहीत आहे पोरा,
साऱ्याच गोष्टी नाही झटपट आत्मसात होत,
तरीही वळूनवळून करावा लागतो विचार
तणावात बुडून मिळवलेल्या यशापेक्षा
तोलात राहून मिळवलेलं यश मौल्यवान आहे !
यश कसं मिळवायचं हे शिक;
आणि झालंच, तर
अपयश कसं पचवायचं हेही शिक…
नसतील शाळा शिकवत, तर
लढून लढून जखमी झालेल्या
नि जखमांतूनच पीक घेणाऱ्या
बापाकडं पाहून तर शिकच शिक…
शिक्षणासाठी शेत विकलं
म्हणून खचून नको जाऊ;
आत्मविश्‍वास नाही अजून विकला,
याचा गर्व नको विसरू !
मात्र त्याचबरोबर
लाभू दे तुझ्या मनाला संयम
अन्‌ जगणं समजून घेण्याचं बळ…

समजून घे :
आकाशभरारी घेणाऱ्या पक्ष्यांच्या
पायालाही चिकटतात मातीचे कण
डोळ्यांतून गळणाऱ्या त्यांच्या स्वप्नांचे
पृथ्वीवर होतात मोती
शाळेत स्वतः हाही धडा घे,
श्‍वास संपवून मिळवलेल्या यशापेक्षा
एक पाऊल मागं जाणं असतं सुंदर.
आपली स्वप्नं, आपल्या वाटा
व्यवस्थेच्या जबड्यातून ओढून काढायला शिक
सर्वांनी ठरवलं मूर्ख, तरी ठासून सांग ः
मी विद्यार्थी आहे – परीक्षार्थी नाही!
माणूस आहे – रेसचा घोडा नाही!!
इतर मुलांनाही पटवता आलं तर बघ
मृगजळाच्या मागं धावत
आतडी गमावू नयेत

आणि हेही त्यांना सांग :
शिक्षकांचं ऐकावं – पालकांचं ऐकावं;
पण समजून घ्यावं त्यांना, स्वतःचीच ऊर्जा वापरून
फेकाव्यात अवास्तव अपेक्षा
आणि स्वीकारावी पायाला लागेल तेवढीच माती
हसत हसत शिकावं, काळजातला ताण फेकून…

आणि ऐक पोरा,
कमी गुणांची, नापासाची
लाज नको बाळगू
पास-नापास पार करून
आयुष्य असतं धावत – कधी नको विसरू
बापामधला नको पाहू
घोड्याचा मालक,
बापामधला नको विसरू
प्रेमळ पालक…
पोरा, पुरेपूर समजून घे
भरपूर करायची असते कमाई;
पण भरपूर घाम गाळून
आत्मा विकून नव्हे…
मनाचा आणि मनगटाचा
धिक्कार करणारा आलाच ऋतू, तर
आईच्या पदराखाली लपायला शिक…
ठसवून घे स्वतःच्या मनावर
जे भावतं आणि जे गावतं
तेच मिळवेन मी
आत्मा गमावून
धावत्याच्या मागं नाही लागणार मी!

नीट समजून घे पोरा,
आत्महत्या करून कळत नसतं आयुष्य;
तर लढूनच जाणावं लागतं आयुष्य
यासाठी अंगी बाणव
प्रश्‍न विचारण्याचं सामर्थ्य!
जगण्याचा अर्थ सांगणारं शिक्षण!
आत्महत्या असते मूर्खपणाची
तिच्यासाठी अक्कल नसते लागत
जगणंच असतं शौर्याचं
लढल्याशिवाय नाही ते उमजत…
तुझा दृढ विश्‍वास पाहिजे :
दगा देणाऱ्या ऋतूनंतरही
त्याचीच पुन्हा वाट पाहणाऱ्या आपल्या बापावर…

माफ कर पोरा, मी फार बोलतो आहे,
माझं नव्हे, तर तुझंच भलं चाहतो आहे
बघ, आयुष्यातील सुरवातच बघ
माझाच पोरगा तू
उगवणारा सूर्य तू नक्कीच पाहशील !
तुला हवं तसंच चित्र तू काढशील !
आशाळभूत बापासाठीही
थोडा रंग ठेवशील !
हा सारा ताण – ताण…
मरणाची सुटली घाण-घाण…
काळाच रंग फासशील तू त्यांच्यावर
ते कधीच दिसू नयेत म्हणून…
उद्याच्या सूर्याआड येऊ नयेत म्हणून…

अब्राहम लिंकन, वसंत बापट यांचे स्मरण करून आणि उगवतीच्या हातात कळ्या-फुले देऊन

Featured Image: By Alex from Ithaca (Father and Son)

One thought on “Words of Wisdom for My Son

Leave a Reply